बिझनेस कोणता करावा?

बिझनेस कोणता करावा?

बिझनेस करण्याची इच्छा तर आहे पण, सुरुवात कुठून करावी? नेमका कोणता बिझनेस करावा? नेमकं हेच अनेकांना कळत नाही. माझ्या सेमिनार्समध्ये हा प्रश्न अनेक जण मला विचारत असतात. बिझनेसमध्ये उतरू इच्छिणाऱ्या अनेक होतकरू तरुणांसाठी हा ब्लॉग मार्गदर्शक ठरणार आहे. 
1. तुमच्यातल्या कौशल्याला व्यवसायाचं स्वरूप द्या. 
लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींनी तर आपापल्या परीनं छोटा-मोठा धंदा सुरू केला. बरेच जण स्वतःचं काहीतरी सुरू करावं यासाठी धडपडत आहेत. पण, सुरुवात कशापासून करावी किंवा बिझनेस करायचा तर आहे पण कोणता बिझनेस करावा हे अनेकांना समजत नाही. मनापासून बिझनेस करायचा असेल तर आपल्यातलं कौशल्य ओळखा आणि त्याला व्यवसायचं रूप द्या. तुमची आवडच तुमच्या उत्पन्नाचं साधन बनली तर दिर्घकाळ तुम्ही त्या कामासाठी स्वतःला झोकून द्याल आणि जोखीम घेण्यासाठीही सदैव तयार रहाल.  

2. बिझनेस कोणताही करा, पण पॅशनने करा. 

तुमची आवड काय आहे किंवा तुमच्याकडे कोणतं कौशल्य आहे ते ओळखा. त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद हा तुम्हाला केवळ तुमच्यापुरता सिमित ठेवायचा आहे, की त्याचा लाभ इतरांनाही व्हावा असं तुम्हाला वाटतं. आवडीचं रुपांतर व्यवसायात करता येऊ शकतं परंतु, त्याच्यासाठी लागणारं भांडवल, अभ्यास, जोखीम घ्यायची तुमची तयारी हवी. एखाद्या कामात तुम्हाला अपयश आलं तरीही ते स्वीकारून त्यावर आत्मविश्वासाने मात करून यश मिळवण्याची जिद्द तुमच्याकडे हवी आणि सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमची दुर्दैम्य इच्छाशक्ती, तुमचं पॅशन.. 

3. लोकांच्या गरजा ओळखायला शिका. 
तुमच्या व्यवसायातून लोकांना काय फायदा मिळणार आहे, त्यातून त्यांची सोय होणार आहे का? त्यांचा त्रास कमी होऊन गरजा भागणार आहेत का? याचा विचार करा. ज्या भागात तुम्ही बिझनेस सुरू करू इच्छित आहात त्या भागातील रहिवाशांची मानसिकता, आर्थिक क्षमता, अपेक्षा, आवड, संस्कृती विचारात घ्या. त्या भागातील लोकांच्या गरजांचा अभ्यास करा, जी वस्तू अथवा सेवा त्या भागात उपलब्ध नाही किंवा कमी प्रमाणात, कमी दर्जाची आहे ती वस्तू/सेवा तुम्ही पुरवू शकता. कोणत्या गोष्टीमुळे लोकांचा वेळ, कष्ट, पैसा यांची बचत होईल यावर लक्ष द्या. अशा गरजा/अडचणी तुम्ही शोधू शकलात, तर बिझनेस कोणता करावा? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल.    
4. व्यवसाय क्षेत्राचं ज्ञान असल्याशिवाय तुमचा टिकाव लागणार नाही. 

ग्राहकांच्या गरजांबरोबरच महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या होऊ घातलेल्या बिझनेसचं तुम्हाला असलेलं टेक्निकल/ इंडस्ट्री/डोमेन नॉलेज. एखादी गोष्ट तुम्ही ग्राहकांना सर्वोत्तम तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्हाला त्यातील इत्यंभूत माहिती असते. एखादी गोष्ट जोवर तुम्हाला मनापासून आवडत नाही, तोवर तुम्ही त्याच्या खोलात जात नाही आणि जोवर खोलात जात नाही तोवर तुम्हाला ती गोष्ट इतरांहून चांगली करता येणार नाही. तुमच्याकडे काहीतरी इतरांपेक्षा चांगलं आणि तेही रास्त दरात उपलब्ध असेल तर लोक तुमच्याकडे येणारच.            
       
5. ऑऊट ऑफ द बॉक्स विचार करा. 

अशी कोणती सेवा आहे किंवा कोणतं प्रोडक्ट आहे जे सध्या अस्तित्वात नाही परंतु त्याची निर्मिती केली तर त्याचा लोकांना चांगला उपयोग होईल याचा विचार करा. सध्या प्रचलित असलेली ओला, उबर सारखी कॅब सेवा असेल किंवा स्विगी, झोमॅटो, उबर इट्स सारख्या फुड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या असोत, गुगल पे, फोन पे यांसारख्या ऑनलाईन पेमेंट सुविधा असतील यांनी ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार केलाय म्हणूनच आज त्यांना मागणी आहे. आपल्यापुढे डी-मार्टचं उदाहरण आहे. राधाकिशन दमानी यांनी 2002 साली पवईमध्ये याची पहिली ब्रांच सुरू केली होती आणि बघता बघता 2019 अखेरपर्यंत देशातील 11 राज्यांच्या 72 शहरांमध्ये त्यांनी 196 स्टोअर्स सुरू करून आपली व्याप्ती वाढवली. 


6. बिझनेस तोच करा ज्याचं भांडवल उभं करणं तुमच्या आवाक्यात आहे.

भांडवल कुठून आणणार, त्यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत, याचं नियोजन करा. शिवाय बिझनेस सुरू झाल्यानंतर त्यातून महिन्याला किती उत्पन्न मिळेल आणि किती दिवसात भांडवलासाठी वापरलेली रक्कम पुन्हा मिळवता येईल याचा ताळेबंध ठेवा. एखाद्या बिझनेसचा खर्च आवाक्याबाहेरचा आहे म्हणून निराश होऊ नका. सुरुवात छोट्या पातळीवर करून त्याला मोठं स्वरूप देता येईल.  
7. स्वार्थी विचार करून बिझनेसमध्ये उतरू नका.
तुम्ही कोणता व्यवसाय करावा याचं उत्तरं दुसरं कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही. हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. तुमची आवड, भांडवल, जिद्द, जोखीम घेण्याची तयारी या निकषांवर तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर स्वतःला द्यायचं आहे. शेवटी एकच सांगतो केवळ श्रीमंत होण्याचा स्वार्थी विचार ठेवून कोणताही बिझनेस करू नका, सेवाभावाने धंद्यात उतरा तुम्ही दिर्घकाळ टिकाल.