एकाच भेटीत समोरच्याचं मन जिंका. 'संभाषण कौशल्य'

एकाच भेटीत समोरच्याचं मन जिंका. 'संभाषण कौशल्य'

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मुलाखतीसाठी, व्यावसायिक कारणासाठी किंवा एखाद्या क्लाएंटला पहिल्यांदाच भेटत असाल तेव्हा समोरच्यावर छाप पाडण्यासाठी तुमचं संभाषण कौशल्य अतिशय महत्त्वाचं असतं. कारण बहुदा त्या एकाच भेटीमध्ये ती व्यक्ती तुमची व्याख्या करत असते किंवा तुम्हाला लक्षात ठेवते. यावेळी तुम्ही चुकलात तर तुमच्याबद्दलची एक नकारात्मक छबी त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते. अनेकदा तुमच्या संभाषण कौशल्याअभावी तुमच्या हातून चांगल्या संधी निसटण्याची सुद्धा शक्यता असते. तुमच्याबाबतीत असं कधी झालंय का? तुम्ही इंजिनिअरींग, बिझनेस मॅनेजमेंट किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातले असा संभाषण कौशल्य तुमच्याकडे असलंच पाहिजे. 
तुमची भाषा  
तुम्ही बोलत असताना तुमची भाषा, तुमचे शब्द, शब्दरचना महत्त्वाची आहे. तुमच्या भाषेवरून, बोलण्यावरून तुम्हाला संबंधित गोष्टीचं असलेलं ज्ञान, तुमचा अनुभव दिसून येतो. भाषा शुद्ध आणि स्पष्ट असावी. पण, म्हणून समोरच्यावर प्रभाव पाडण्यासाठी उगाच अवघड शब्द किंवा रोजच्या वापरात नसलेले, पुस्तकी शब्द वापरू नका. भाषा तर महत्त्वाची आहेच पण भाषेपेक्षाही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घेऊया..  
आवाजातील चढ-उतार (Voice Modulation) 
तुमच्या भाषेबरोबरच तुमच्या आवाजात आवश्यकतेनुसार चढउचार असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या बॉसशी कसे बोलता? त्यांच्याशी जर तुम्ही मोठ्या आवाजात किंवा उद्धटपणे बोललात तर तुमची नोकरी राहिल का? तुमच्या बोलण्यातली नम्रता, राग, आत्मीयता, प्रामाणिकपणा हा तुम्ही ज्या पद्धतीने किंवा जशा आवाजात बोलता त्यावरून कळून येतो. तसंच, तुम्ही किती आत्मविश्वासू आहात हेही समोरच्याला कळून येतं. त्यामुळे कुठल्याही महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलताना आत्मविश्वासाने बोला, परंतु तुमच्या आवाजात नम्रता असुद्या. जर तुम्ही एकाच पट्टीत सातत्याने बोलत असाल तर तुम्ही रूड वाटता.  
आपले हावभाव/हातवारे (Body Language)  
तुम्ही घरात असताना किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बोलताना जसे वागता, तुमची बॉडी लँग्वेज जशी असते तशी प्रोफेशनली वावरताना असायला हवी का? तर नाही. त्यामुळेच तुमचे हातवारे, हावभाव हे बरंच राही सांगून जातात. तुम्ही किती प्रोफेशनल आहात हे त्यावरून दिसून येतं. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिक मिटींगमध्ये किंवा तुमच्या वरिष्ठांशी, क्लाएंट्सशी बोलताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुम्ही जर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आहात तर तुमचं संभाषण कौशल्य चोख असलं पाहिजे. कारण तुमच्या गेस्ट्सना काही इश्यू असतील तर ते केवळ तुमच्या चांगल्या संभाषण कौशल्याने तुम्ही सोडवू शकणार आहात. कोणीही जन्मापासून हे कौशल्य घेऊन येत नाही, तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, सराव करावा लागेल.  
ऐका, वाचा, लिहा
तुम्ही काय वाचता, काय लिहिता, काय ऐकता किंवा कोणाला फॉलो करता याचा तुमच्यावर संभाषणावर आपोआपच परिणाम होत असतो. तुम्ही रेग्युलर्ली वाचता का? काय वाचता? लिहिता का? तुम्ही चांगल्या कम्युनिकेटर्सना पाहता का? यु ट्यूब किंवा इतर ठिकाणी. ऑडिऑज ऐकता का? आपला मेंदू वेगवेगळ्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचं काम करत असतो. त्या सगळ्याचा वापर करून घ्या. तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे, पण ते सादर करण्याची कला तुमच्याकडे नाही किंवा माहीत असूनही तुम्हाला ते तुमच्या वरिष्ठांना चांगल्या पद्धतीने किंवा कन्विंसींगली सांगता येत नसेल, तर तुम्ही केपेबल असूनही मागेच रहाल. दुसरं कोणीतरी येऊन त्याचं म्हणणं मांडून सगळ्यांची मनं जिंकेल. तुम्ही एखादी गोष्ट करू शकत असाल, जबाबदारी घेऊ शकत असाल, तर तुम्हाला तो विश्वास समोरच्याला दाखवता आला पाहिजे आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमच्याकडे संभाषण कौशल्य असेल. 
इंग्लिश येणं म्हणजे संभाषण कौशल्य नव्हे
बऱ्याच जणांना वाटतं मी चांगलं इंग्लिश बोलतो म्हणजे माझं संभाषण कौशल्य चांगलं आहे. लक्षात घ्या इंग्रजी ही भाषा आहे आणि संभाषण कौशल्य ही एक कला आहे. या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला तुमचं संभाषण कौशल्य सुधारायचं असेल तर तुमच्या मातृभाषेपासून सुरुवात करा. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोला. मी मघाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आवाजातले चढ-उतार, हावभाव सुधारा. यासाठी इंग्लिश येण्याची गरज नाही. साईड बाय साईड तुम्हाला तुमचं इंग्लिश सुधारायचं असेल किंवा शिकायचं असेल तर ते ही तुम्ही करू शकता.