वयाच्या 9व्या वर्षी बनली सीईओ... पहा काय करते श्रीलक्ष्मी सुरेश!

वयाच्या 9व्या वर्षी बनली सीईओ... पहा काय करते श्रीलक्ष्मी सुरेश!

आपल्यापैकी अनेकजन काम न करण्याची अनेक कारणं देत असतात... काही लोकांनी तर कारणं देण्यात पीएचडी केलेली असते. त्यांच्याकडे कारणं तयारच असतात; पण याउलट काही लोकं आहेत जी कामालाच आपलं सर्वस्व मानतात. ते काम पूर्ण करण्याची अनेक कारणं शोधत असतात. हे गुण फक्त ज्येष्ठांमध्ये नसतात तर ते कनिष्ठांमध्ये सुद्धा असतात. अशाच एका मुलीची प्रेरणादायी कथा आपण येथे जाणून घेणार आहोत. जी वयाच्या 9व्या वर्षी बनली सीईओ म्हणजेच एका कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी झाली. पाहू यात केरळ राज्यातील श्रीलक्ष्मी सुरेश या मुलीबद्दल...

मेनन परिवारात जन्म... केरळ राज्यातील कोझिकोडे जिल्ह्यामधील मेनन परिवारामध्ये श्रीलक्ष्मी सुरेश हिचा जन्म झाला. लहानपणापासून श्रीलक्ष्मीला संगणकाचे आकर्षण... किबोर्डवर अक्षर टाईप करणे, माऊसशी खेळण्यात तिचे बालपण गेले. 

 
वयाच्या चौथ्या वर्षी वेबसाईट डिझाईन... "वयाच्या तिस-या वर्षी श्रीलक्ष्मीने संगणक वापरायला सुरुवात केली तर वयाच्या चौथ्या वर्षी ती वेबसाईट डिझाईन करु लागली," असे तिचे बाबा सुरेश मेनन सांगतात. आजकालची किशोरवयीन किंवा प्रौढ मुलांमध्ये इतकी प्रगल्भता दिसून येत नाही तितकी कोवळ्या मनाच्या आणि वयाच्या श्रीलक्ष्मी सुरेशमध्ये दिसून आली.


ख्यातनाम वेबसाईट बनवली... वाचकांना एक विनंती आहे... त्यांनी पुढे दिलेल्या संकेतस्थळावर जावे आणि ही वेबसाईट पहावी. http://barcouncilkerala.org/ ही वेबसाईट श्रीलक्ष्मी सुरेश यांनी वयाच्या आठव्या वर्षी बनवली. ही वेबसाईट केरळमधील सर्व वकिलांची माहिती देते, तसेच त्याच्या नियमांवर भाष्य करते. वयाच्या आठव्या वर्षी अशी वेबसाईट बनवणे म्हणजे एक दिव्यच... ते चिमुकल्या श्रीलक्ष्मीने करुन दाखवले. 2006 साली श्रीलक्ष्मीचा कारनामा जगासमोर आला. वयाच्या 9व्या वर्षापर्यंत तिने अनेक वेबसाईट बनविल्या होत्या आणि वेबसाईट बनविणा-या कंपनीची सीईओ बनली होती.


श्रीलक्ष्मी आज काय करते... श्रीलक्ष्मी सुरेश आता चिमुकली राहिली नाही. तिने शिक्षणासहीत वेबसाईट बनविण्याशी निगडीत असे अनेक कोर्स केले आणि आपले ज्ञान वाढवले. आज ती एका प्रसिद्ध वेबसाईट डिझाईन करणारी कंपनी चालवते. या असामान्य कार्यासाठी तिला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यामधील 'जगातील सर्वात कमी वयाची सीईओ' आणि 'जगातील सर्वात तरुण वेब डिझायनर' हे पुरस्कार आपले लक्ष वेधून घेतात. तसेच 'असोसिएशन ऑफ अमेरिकन वेबमास्टर्स' या संस्थेमध्ये १८ वर्षाखालील सभासद असणारी ती एकटीच आहे.

उद्योजकांनो आणि तरुणांनो, कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वयाचे बंधन कधीच नसते. तुम्ही श्रीलक्ष्मीसारखं उमेदीच्या काळात किंवा आताही काहीही शिकू शकता, करु शकता... कारण नवनवीन शिकण्यामुळेच आपल्याला जास्तीत जास्त पैसे कमविण्याचे मार्ग मिळू शकतात...