1 कोटींपर्यंतचे व्यवसायिक कर्ज मिळणार फक्त 59 मिनिटात!

1 कोटींपर्यंतचे व्यवसायिक कर्ज मिळणार फक्त 59 मिनिटात!

देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योजकांसाठी महत्त्वाची बातमी आणि खूषखबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांसाठी सर्वात जलद कर्ज मिळण्यासाठी कृती योजना तयार केले आहे. याअंतर्गत छोट्या बिझनेसेसला 1 कोटींपर्यंतचे कर्ज आणि तेही फक्त 59 मिनिटात मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

छोट्या उद्योजकांना सुखावणारी योजना... ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारची ही योजना सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना सुखवणारी ठरेल हे नक्की. मागच्या काही वर्षात नोटाबंदी आणि जीएसटी कर यासारख्या घटनांमुळे व्यापा-यांचे कंबरडे मोडले होते. अशा व्यापारी वर्गासाठी ही योजना लाभदायक ठरेल. तसेच मोठा व्यवसाय करायलाही प्रेरणा देईल. 


बिझनेस कर्जाची समस्या... उद्योजकांसाठी कर्ज उभे करणे ही पूर्वीपासून एक समस्या राहिली आहे. कर्ज घेताना त्यामध्ये येणारे अडथळे काही नवी नाहीत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी हे अडथळे अजून मारक ठरतात. म्हणूनच या योजनेद्वारे केंद्र सरकारने अशा उद्योगधंद्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे.


"सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात ही योजना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचा व्यवसाय वाढविण्यास मदत करेल,'' असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान स्वतः पुढच्या 100 दिवसात 100 तालुक्यात ही योजना पोहोचेल याची अंमलबजावणी आणि देखरेख करणार आहेत.


या योजनेअंतर्गत सर्व राज्यातील उद्योजकांनी आपली नोंदणी सरकारी ई-मार्केटप्लेस आणि ऑनलाइन खरेदी योजनेसाठी करावी, याद्वारे उद्योजकांना वस्तू आणि सेवा प्रदान करण्यात येतील. या योजनेबद्दल अधिक माहिती सर्वत्र लवकरच देण्यात येईल.