तामिळनाडूमधील छोट्याशा गावातून आलेले शिव नाडर... आज आहेत भारतातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक!

तामिळनाडूमधील छोट्याशा गावातून आलेले शिव नाडर... आज आहेत भारतातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक!

पक्षी आकाशात मुक्त संचार करतात. त्यांना कुणाचेही बंधन नसते. त्यांच्या पंखातील बळ त्यांना सर्वत्र संचार करण्यासाठी साथ देत असतात. आपलेही तसेच आहे. आपण स्वप्न पाहयची, उंच उडी घ्यायची आणि यशाची शिखरं गाठायची; पण तुम्ही म्हणाल हे एवढं सोपं नसतं. नक्कीच! सुरुवात तर करा रस्ता आपोआप दिसेल आणि यशही आपसूकच मिळेल. अशी एक सुरुवात शिव नाडर यांनी तामिळनाडूमधील छोट्याश्या भागातून केली. आज ते भारतातील श्रीमंत उद्योजकांपैकी आघाडीचे उद्योगपती आहे. तर आज घेऊयात शिव नाडर यांच्या बिझनेस प्रवासाचा आढावा...

सुरुवात... शिव नाडर यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील तिरुचेंडूर येथील नाडर कुटुंबातला. घरात शिक्षणाचे महत्त्व फार म्हणूनच शिव यांना सर्वोत्तम शिक्षण मिळाले, त्यांनीही शिक्षणातून स्वतःचे ज्ञान वृद्धिंगत करण्यास सुरुवात केली. पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी कोयम्तूर येथून त्यांनी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची डिग्री संपादन केली.


पुण्यातून करीअरला सुरुवात... शिक्षण झाल्यावर शिव यांनी पुणे गाठले. 1967 साली वालचंद समुहाच्या कूपर इंजिनिअरिंग येथे काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी व्यवहारिक ज्ञान प्राप्त केले. कोणाच्या हाताखाली काम करायचे नाही, हे त्यांच्या मनात पूर्वीपासून होते. यातच त्यांनी स्वतःची कंपनी सुरु करण्याचे ठरवले. 

टेलिडिजिटल कॅलक्युलेटरचा बिझनेस... शिव यांनी त्यांच्या मित्रांसमवेत 'मायक्रोकॉर्प' नावाने टेलिडिजिटल कॅलक्युलेटरचा बिझनेस सुरु केला आणि ते कॅलक्युलेटर्स ते भारतीय बाजारात विक्री करीत असत. असे असताना संगणक हेच भविष्य आहे आणि त्यातच काम केले पाहिजे हे त्यांना कळले. अशातच 1976 साली 1,87,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 'एचसीएल टेक्नॉलॉजिझ' या कंपनीची स्थापना केली. त्यास आपण 'हिंदुस्तान कॉम्प्यूटर्स लिमिटेड' असेही संबोधतो. आज ही कंपनी देशातील आयटी सेक्टरमधील अति महत्त्वाची कंपनी म्हणून ओळखली जाते.


शैक्षणिक सेवांवर भर... जगभरातील आयटी क्षेत्रात एचसीएलचा झंझावात सुरु असताना शिव शैक्षणिक विभागात उतरले. त्यांनी चेन्नईमध्ये एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग सुरु केले. पुढे नाडर यांना 2005 मध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या कार्यकारी मंडळावर नियुक्ती करण्यात आली. तसेच नाडर यांनी काही काळ आयआयटी खरगपूरच्या राज्यपाल मंडळाचे अध्यक्षपदहीए भुषवले आहे.

भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये सहावे स्थान... प्रसिद्ध कंपनीचे संस्थापक आणि उद्योजक अशी बिरुदावली मिरवणारे शिव नाडर यांनी फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहावे स्थान पटकावले आहे. त्यांची नेटवर्थ 14.6 बिलियन अमेरिकन डॉलर एवढी आहे. बिझनेस आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने त्यांना 2008 साली पद्म भूषण खिताब देऊन गौरविण्यात आले.