Blog-Image

नेहमी मोठे स्वप्न पहा,  मोठे ध्येय ठेवा असा सल्ला यशस्वी लोक देतात.  तुम्हाला यश मिळणार की तुम्ही अपयशी ठरणार,  हे तुमच्या क्षमतेवर नाही, तर तुमचा निश्चय किती दृढ आहे यावर अवलंबून असते. अशाच एक ध्येयवेड्या उद्योजकाचे नाव होते एडविन सी बार्न्स.

बार्न्स यांना थॉमस अल्व्हा एडिसन यांचा पार्टनर व्हायचे होते. तेव्हा थॉमस अल्व्हा एडिसनचा पार्टनर होण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे आजच्या काळात थेट बिल गेट्स किंवा एलोन मस्क यांचा पार्टनर होण्याचे स्वप्न पाहण्यासारखे आहे. बार्न्स यांची थॉमस अल्व्हा एडिसन यांचा पार्टनर होण्याची इच्छा प्रबळ होती. बार्न्स यांनी एडिसनला भेटायचे ठरवले. पण खिशात एक कवडी देखील नव्हती. आर्थिक स्थिती इतकी वाईट होती की त्यांच्याकडे एडिसनकडे जाण्यासाठी प्रवासखर्च देखील नव्हता.  एका मालवाहू ट्रेनने विनातिकीट प्रवास करून ते एडिसनच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी एडिसनची भेट घेतली आणि मला तुमचा पार्टनर बनायचे असल्याचे सांगितले. जगातील सर्वात मोठे संशोधक असणाऱ्या एडिसन यांनी साहजिकच बार्न्स यांचा प्रस्ताव नाकारला. परंतु बार्न्स यांच्या व्यक्तिमत्त्वाने ते प्रभावित झाले. त्यांनी बार्न्स यांना आपल्या कंपनीत काम देण्याचे ठरवले. बार्न्स यांनी लगेच एडिसनकडे नोकरी करण्याची संधी स्वीकारली. कंपनीत झाडू मारण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.  

 बार्न्स यांनी जवळपास दोन वर्ष एडिसन यांच्या कंपनीत छोटी मोठी कामे केली. या काळात त्यांनी एडिसनच्या काम करण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केले. याच काळात एडिसन यांनी एडीफोन नावाचे एक प्रॉडक्ट तयार केले होते. पण या प्रॉडक्टची विक्री कशी करावी असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. एडिसन यांच्या विक्री  विभागाने ही मशीन विकल्या जाणार नाही, असे सांगत एडीफोनची कल्पना चालू शकणार नसल्याचे सांगत ती आयडिया नाकारली होती.

ही संधी बार्न्स यांनी हेरली, आणि एडीफोन विकण्याची आपली योजना एडिसनसमोर मांडली. बार्न्स यांची योजना एडिसनला आवडली. बार्न्स यांनी एडीफोनची मोठ्या प्रमाणात विक्री केली. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विक्रीतून बार्न्स यांनी चांगला नफा कमावला. पुढे बार्न्स यांनी स्वतःची कंपनी सुरु केली. बार्न्स यांचे प्रस्थ एवढे वाढले की पुढे पुढे एडीफोनच्या जाहिरातीत 'मेड बाय एडिसन अँड इंस्टॉलेड बार्न्स' असे वाक्य वापरले जात होते.  

बार्न्स यांच्याकडून काय शिकावे ?  

सुरुवातीला जरी एडिसनने बार्न्स यांचा प्रस्ताव फेटाळला, तरी काही वर्षांनी बार्न्स हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झाले.  पार्टनरशिपसाठी आलेल्या बार्न्स याना एडिसनकडे काम करण्यात कोणताही कमीपणा वाटला नाही. कारण त्यांना आपल्या ध्येयावर आणि स्वतःवर विश्वास होता.

आपण इथे काही काळ काम करू जर पूढे काही झाले नाही, तर हे काम सोडून अन्यत्र प्रयत्न करू, असा विचार कधीच बार्न्स यांच्या मनात आला नाही.

मी अंगावर पडेल ते काम करेन, एडिसन जे सांगेन ते मी करायला तयार आहे, पण मी या कंपनीतून एडिसनचा पार्टनर बनूनच बाहेर पडणार. हा दृढ निश्चय बार्न्स यांनी केला होता.   ध्येय ठरले असेल तर मार्ग आपोआप सापडतो. एडिसनशी कोणतीही ओळख नसताना, भेटायला जाण्यासाठीदेखील पैसे नसताना बार्न्स यांनी थेट एडिसनचा पार्टनर होण्याचे स्वप्न पहिले. आणि आपल्या अथक प्रयत्नातून ते पूर्णत्वास देखील उतरवले.