Blog-Image

मायक्रोसॉफ्टने एक अत्यंत वेगळा प्रयोग त्यांच्या जपानमधील कंपनीत राबविला. मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांसाठी थेट तीन दिवस सुटी दिली. आणि या सुट्या विभागून देण्यात आल्या नाहीत तर एकत्र देण्यात आल्या.  मायक्रॉसॉफ्ट जपानने ४ दिवसांच्या आठवड्याची कल्पना प्रायोगिक तत्वावर ऑगस्ट महिन्यात राबवली. आठवड्यात एक दिवस म्हणजे महिन्याच्या ४ सुट्या अधिक मिळून देखीलही कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आली नाही. आता यात केवळ कर्मचाऱ्यांची चंगळ झाली कंपनीचा त्यात कायदा काय ? तर जास्त सुट्या दिल्यामुळे कंपनीची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजेच उत्पादकता ४० टक्क्यांनी वाढली. या प्रोजेक्टचे नाव 'वर्क-लाइफ चॉइस चॅलेंज समर २०१९' असे ठेवण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टने त्यांच्या २३०० कर्मचाऱ्यांना पगारात कोणतीही कपात न करता महिन्यातील प्रत्येक शुक्रवारीही सुटी देण्यात आली. 

कामाचे दिवस कमी केल्याने कर्मचाऱ्यांचा कामाचा उत्साह वाढला, कंपनीचे वातावरण आनंदी झाल्याने त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या एकूण कार्यक्षमतेवर झाला. आणि यामुळे प्रोडक्टिव्हिटी किंवा उत्पादकता तब्बल ४० टक्क्यांनी वाढली. 

कमी वेळ काम करा ,पुरेशी विश्रांती घ्या आणि भरपूर शिका, असे आमचे धोरण या प्रयोगामागे होते असे मायक्रोसॉफ्ट जपानचे अध्यक्ष आणि सीईओ टाकूया हिरानो यांनी सांगितले आहे. २० टक्के कमी काम करुनही समान परिणाम कसे मिळवावेत याचा विचार कर्मचाऱ्यांनी करावा असे मला वाटते.   

कार्यक्षमतेत वाढ तर झालीच पण या काळात कर्मचाऱ्यांचे सुट्या घेण्याचे प्रमाण देखील २५ टक्क्यांनी घटले. कार्यालयांतील विजेच्या वापरात २३ टक्क्यांनी घट झाली. या काळात पेपर प्रिंटिंगमध्ये ५९ टक्के कपात झाली. ९२ टक्के कर्मचाऱ्यांनी ४ दिवसांचा आठवडा आवडला असल्याचे सांगितले.   मोठ्या वीकएंडचा प्रयोग याआधी अनेकवेळा झाला आहे. २०१८ मध्ये न्यूझीलँडमधील पर्पेच्युअल गार्डियन या कंपनीने त्यांच्या २४० कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी आठवड्याला तीन दिवसांची सुट्टी देण्याचा प्रयोग केला होता. या दरम्यान कर्मचाऱ्यांचा तणाव ७ टक्क्यांनी कमी झाला. परंतु जपानमध्ये राबवण्यात आलेला हा प्रोजेक्ट केवळ प्रायोगिक तत्वावर होता. हे बदल मायक्रोसॉफ्टच्या इतर ऑफिसमध्ये राबविले जातील, किंवा दीर्घकाल राबविले जातील याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.   

आपली उत्पादकता वाढवण्याचा विचार मोठ्या कंपन्या किती गांभीर्याने आणि किती विचारपूर्वक करतात याचे मायक्रोसॉक्टचा प्रयोग एक चांगले उदाहरण आहे. या प्रयोगामुळे उत्पादकता वाढली असली तरी त्याची कायमस्वरूपी अंबलबजावणी करण्याची कोणतीही घाई मायक्रोसॉक्टने केली नाही. कारण या बदलांचे दीर्घकालीन परिणाम त्यांना माहित नाही. आपल्या व्यवसायात बदल करताना त्याबाबत सखोल विचार करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याला प्रायोगिक तत्त्वावर राबवून पुढे आलेल्या परिणामांचा अभ्यास आणि विश्लेषण करायचे असते. तत्काळ फायदा दिसत असला तरी घाईत किंवा अविचारात निर्णय घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. कर्मचाऱ्यांना कामासह वैयक्तिक जीवन असते त्यासाठी त्यांना वेळ देता यावा याबाबत मायक्रोसॉफ्ट या कंपनीने विचार करणे ही कौतुकास्पद बाब आहे. तुमचा कर्मचारी वर्ग जितका आनंदी असेल तितकाच फायदा हा तुम्हाला होईल. केवळ तंत्रज्ञानावर नाही तर कर्मचाऱ्यांचा विचार करून तुम्ही कसे उत्पादन वाढवू शकतात याचे मायक्रोसॉफ्ट उत्तम उदाहरण आहे. 

अमेरिकेत वीकएंड हा शुक्रवारी संध्याकाळपासून सुरु होतो. तर युरोपमधील अनेक देशांमध्ये शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असतात. भारतात मात्र रविवार हा एकच सुटीचा दिवस असतो तर काही कार्यालयांमध्ये महिन्यातील दोन शनिवारीदेखील सुटी दिली जाते. सुटीचा एक दिवस हा कर्मचारी वर्गासाठी अत्यंत मोलाचा असतो. केवळ रविवारीच सुटी असलेल्या कार्यालयांमध्ये तर शनिवारीदेखील सुटी देण्यात यावी यासाठी कर्मचारी वर्ग कायम व्यवस्थापकांच्या मागे भुणभुण करीत असतात. पण आठवड्यात कामाचे दिवस किती असावे याबाबत काही दशकांपासून चर्चा केली जात आहे. सध्यातरी जगभरात कामासाठी ५ दे वर्किंग मॉडेल प्रमाण म्हणून वापरण्यात येत आहे.