काय आहे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग ? मूलभूत स्तरावर,इन्फ्लुएन्सर मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंगचा प्रकार आहे. यात इन्फ्लुएन्सर एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट्सची एन्डॉर्समेंट करतात. या एन्फ्लूअर्सची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलोविंग असते. एन्फ्लूअर्सच्या फॉलोवर्सचा त्यांच्यावर विश्वास असतो. म्हणूनच मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गुरुजींनी एखाद्या फोनला थंब्स अप दिला की त्याचे फॉलोवर्स तो फोन विकत घेतात.
इन्फ्लुएन्सर मार्केटिंग ही एक पॅसिव्ह मार्केटिंग असते. यात इन्फ्लुएन्सरच्या वैयक्तिक स्टाईल आणि प्रेफरन्सचा मार्केटिंगसाठी वापर केला जातो. इन्फ्लुएन्सर कोणत्याही प्रॉडक्टची थेट मार्केटिंग करीत नाही. अमूक एक प्रॉडक्ट विकत घेण्याचे आवाहन देखील त्यांच्या फॉलोवर्सना करत नाही. उलट एन्डॉर्स करीत असेलेले प्रॉडक्ट आपल्या वैयक्तिक पसंतीचे असल्याचे ते दाखवतात. उदाहरणार्थ मी या कंपनीचा मोबाइल वापरतो म्हणून ते सांगतात, किंवा एखाद्या घड्याळाचा ब्रँड प्रमोट करायचा असेल तर ते घड्याळ स्वतः घालून व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करतात.
आज जगभरात अनेक ब्रँड या इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा वापर करतात. या मार्केटिंगचा सर्वाधिक फायदा मिळवला आहे तो डॅनियल वेलिंग्टन या वॉच ब्रँडने. डॅनियल वेलिंग्टन ही एक स्वीडिश वॉच कंपनी आहे. फिलिप टायसेंडर हे या कंपनीचे संस्थापक आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये एकदा त्यांची भेट एका ब्रिटिश व्यक्तीशी झाले. त्याने रोलेक्स घड्याळाला नायलॉनचा पट्टा लावून मनगटाला बांधले होते. या साध्या पट्ट्यामुळे त्यांना स्वतःचा घड्याळाचा ब्रँड निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. त्या व्यक्तीचेच नाव त्यांनी स्वतःच्या कंपनीला दिले. त्या ब्रिटिश व्यक्तीचे नाव होते 'डॅनियल वेलिंग्टन'.
टायसेंडर यांनी 150000 डॉलर टाकून ही कंपनी सुरु केली. चार वर्षानंतर या कंपनीचा रेव्हेन्यू 220 मिलियन डॉलर एवढा होता. 2013 ते 2015 दरम्यान डॅनियल वेलिंग्टन हे युरोपमधील सर्वाधिक गतीने वाढणारी कंपनी होती. या कंपनीचा विकास दर हा 4700 टक्के इतका भन्नाट होता. २०१४ मध्ये त्यांनी एका वर्षात 10 लाख घड्याळे विकण्याचा विक्रम केला. विक्रीचा हा आकडा गाठायला रोलेक्ससारख्या जगप्रसिद्ध ब्रँड ला 111 तर टॅग व्हायरला 156 वर्षे लागली होती. हे कशामुळे शक्य झाले ? 2018 मध्ये 'डॅनियल वेलिंग्टन' या ब्रॅण्डला सोशल मीडियावर सर्वाधिक मेन्शन्स आले. तो इंस्टाग्रामवर सर्वाधिक मेन्शन केलेला ब्रँड होता. 7200 इंफ्लुअर्सने २०००० हुन अधिक वेळा या ब्रँडचा उल्लेख त्यांच्या पोस्टमध्ये केला होता. कस्टम हॅशटॅगचा देखील डॅनियल वेलिंग्टनला मोठा फायदा झाला. इंफ्लुअर्सने #danielwellington वापरून पोस्ट टाकायला सुरुवात केली. हा हॅशटॅग 1,800,000 हुन अधिक पोस्टमध्ये वापरण्यात आला होता. डॅनियल वेलिंग्टन उत्पादन करण्याचा खर्च अत्यंत कमी आहे. त्यात घड्याळांना नायलॉन स्ट्रॅप असल्याने उत्पादन खर्च आणखी कमी होते. हे घड्याळे महागडी भासत असली तरी इतर ब्रँडच्या तुलनेत स्वस्त आहेत. एका घड्याळामागे कंपनी किमतीच्या 50 टक्के एवढी कमाई करते. ज्यामुळे बिझनेसला नफा होतो.
व्रिस्ट वॉचचा वापर केवळ वेळ पाहण्यासाठी होत नाही. ती एक ऍक्सेसरीदेखील आहे. तुमच्या मनगटावर बांधलेल्या घड्याळातून तुमची स्टाईल दिसते. ब्रँडेड घड्याळे अत्यंत महागडे असल्याने एक ब्रँडेड असूनही स्वस्त वॉच डॅनियल वेलिंग्टनने तयार केले. इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचा वापर करून या वॉचला ट्रेंडिंग, मोस्ट डिझायरेबल आणि सर्वाधिक चर्चित प्रॉडक्ट बनवले. म्हणून सोशल मेडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या कोट्यवधी तरुणांना डॅनियल वेलिंग्टन वॉचचे वेड लागले. आणि हा ब्रँड हवाहवासा वाटला. कंपनी लहान असताना कमीतकमी खर्चात आणि कल्पकरीत्या मार्केटिंग कशी करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॅनियल वेलिंग्टन. प्रॉडक्टची भरमसाट विक्री करतानाच क्रिएटिव्हिटी आणि कल्पकतेचा वापर करून तुम्ही मार्केटिंगची एक नवी कॅटेगरीच निर्माण करू शकता. हे डॅनियल वेलिंग्टनने सिद्ध केले.
10 वर्षांआधी इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हे केवळ सेलिब्रिटी आणि काही ब्लॉगर्सपुरते मर्यादित होते. पण सोशल मीडियाची लोकप्रियता जशी वाढत आहे, तसाच या सोशल मीडियातील एन्फ्लूअर्सचा प्रभाव देखील वाढत आहे. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉक अशा आघाडीच्या सोशल मीडियावर अतिशय प्रभावशाली असलेल्या 'सोशल मीडिया सेलिब्रिटीज'च्या मदतीने आज-काल मार्केटिंग केली जात आहे.