आनंद महिंद्रा यांच्यासोबतच समाजातील सर्वांनी दखल घ्यावी अशीच काहीशी कथा हरभजन कौर यांची आहे, ज्या आपल्या घरूनच बेसनची बर्फी बनविण्याचे काम करतात. याची सुरूवात त्यांनी ४ वर्षांपूर्वी केली होती आणि आज त्यांच्या हातची चविष्ट अशा बेसन बर्फीला बाजारात ग्राहकांकडून पुष्कळ मागणी आहे. ९४ वर्षाच्या हरभजन कौर यांनी आपल्या हातांनी बनविलेली बेसन बर्फी जेव्हा चंदीगढच्या साप्ताहिक ऑरगॅनिक मार्केटमध्ये पाठविली जाते तेव्हा ही मिठाई लगेच विकली जाते. अमृतसरच्या जवळ असलेल्या तरन-तारन येथे हरभजन कौर यांचा जन्म झाला. लग्नानंतर त्या अमृतसर आणि नंतर लुधियाना येथे राहिल्या. पतीच्या मृत्यूनंतर म्हणजेच जवळ-जवळ १० वर्षांपूर्वी त्या चंदीगड येथे आपल्या मुलीजवळ राहायला आल्या. एके दिवशी असेच गप्पा मारत असताना त्यांच्या मुलीने बोलण्यातून त्यांच्या मनातील इच्छा विचारली. तेव्हा त्यांनी त्यांची एक इच्छा सांगितली. त्यांनी अख्या आयुष्यात एक रुपया सुद्धा कमविला नाही याची त्यांना खंत होती. तेव्हा त्यांनी मुलीला सांगितले की त्या घरच्या घरीच मंद आचेवर भाजलेल्या बेसनाची उत्तम बर्फी बनवू शकतात.
आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात झाली.. त्यांच्या मुलीने त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी बनविलेली बेसन बर्फी घेऊन त्यांच्या मुलीने ती ऑरगॅनिक मार्केटमध्ये विकली. ग्राहकांना बर्फीची चव आवडली आणि त्यांनतर हरभजन यांना ५ किलो बर्फीची पहिली मोठी ऑर्डर मिळाली. त्यांनतर त्यांच्या हातच्या बर्फीची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बर्फी विकून जेव्हा त्यांना त्यांची पहिली कमाई २ हजार रुपये मिळाले तेव्हा त्या अतिशय आनंदित झाल्या. त्यांच्या डोळ्यातील आनंद त्यांच्या मुलीलाही दिसला. त्यांची हीच गोष्ट ऐकून आनंद महिंद्रा हे हरभज यांच्या स्टार्टअपने प्रभावित झाले. त्यांनी या ९४ वर्षीय उद्योजिकेचे ‘एंटरप्रेन्योर ऑफ द इअर’ म्हणत कौतुक केले व त्यांच्या व्हिडीओ सुद्धा आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हरभजन कौर या नक्कीच आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा आहेत!
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांना न ओळखणारे शोधूनही सापडणार नाहीत. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन असून ते एक भारतीय अब्जाधीश उद्योजक सुद्धा आहेत. त्यांची भारतातील व भारताबाहेरील लोकप्रियता अनन्यसाधारण आहे. ते नेहमीच आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रेरणादायी गोष्टी शेअर करत असतात. खासकरून ट्विटरवर ते अतिशय सक्रिय आहेत. यावेळी सुद्धा त्यांनी समाजाला प्रेरित होता येईल अशी एक गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एका ९४ वर्षीय महिलेची कथा शेअर करून त्यांना ‘एंटरप्रेन्योर ऑफ द इअर’ म्हंटले आहे. त्या महिला म्हणजे चंदीगढच्या हरभजन कौर!