Blog-Image

शिवराय..  आपले शिवराय.. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला.. ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली.. ज्यांनी महाराष्ट्र राखला.. सर्वप्रथम अशा महान छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!  यश मिळविण्यासाठी मैदानात उतरून संघर्ष करणे महत्त्वाचे आहे. ते यश प्राप्त करण्याचा आदर्श आणि शिकवण ज्या महान व्यक्तीकडून आपण घेतो ते आपले मराठी साम्राज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी कधीही कोणासमोर हार मानली नाही. शत्रूंना लढा देऊन स्वराज्याची स्थापना केली.. 10X MBA Online ॲप डाऊनलोड करा त्यांच्यामुळे भारतातील सर्वांत शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जाते. शिवरायांमुळे स्वराज्याची स्थापना होऊन मराठी माणसाला ओळख मिळाली. आपल्या मावळ्यांसोबत राहून त्यांनी सर्व संकटाच्या प्रसंगांना धीराने तोंड दिले. बिझनेसमध्ये जर तुम्हाला कोणाचा आदर्श ठेवायचा आहे तर ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळेच गुण आपण आत्मसात केले पाहिजेत. त्यांचे हे गुण आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा तेवढेच परिणामकारक ठरू शकतात. बिझनेसमध्ये यश मिळविण्यासाठी हे गुण आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. 

आत्मविश्वास:  महाराजांकडे होता तो म्हणजे आत्मविश्वास.. म्हणूनच शिवाजी महाराज हे स्वराज्य मिळवू शकले. आपल्या महाराजांच्या स्वराज्य मिळवण्याच्या  आत्मविश्वासाने त्यांच्या मावळ्यांच्या हृदयामध्ये कधी न विझणारी स्वराज्याची मशाल पेटवली. त्यामुळे ते स्वराज्य स्थापन करू शकले. त्याचप्रमाणे कुठल्याही कार्यासाठी आत्मविश्वास हा गरजेचा आहे. बिसनेस करताना तुमच्यात जर आत्मविश्वास नसला तर तुम्ही यशाचे शिखर गाठू शकणार नाही. 

शौर्य: महाराजांच्या शौर्यगाथा या आपल्यासाठी एक आदर्श आहेत. प्रत्येक संकटाना जसे ते सामोरे गेले तसे आपण ही बिझनेसमधील प्रत्येक समस्यांना सामोरे गेले पाहिजे. तुमच्यातील शौर्य हे समोर आलेल्या संकटावर मात करण्यासाठीचा महत्वाचा गुण आहे. 

कर्तव्य परायणता:  शिवाजी महाराज कधीही आपल्या कर्तव्यापासून दूर राहिले नाही. स्वराज्य निर्माण करण्यासाठी जीव देण्याची वेळ आली तरीही ते आपल्या कर्तव्यापासून दूर झाले नाही. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये तुमचे जे काही कर्तव्य असेल ते जोमाने पार पाडा. आपल्या कर्तव्यांपासून दूर होऊ नका किंवा टाळाटाळ करू नका. 

ध्येयनिष्ठता: महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले, स्वराज्य स्थापन करणे हेच स्वतःच्या जीवनाचे ध्येय ठरवले आणि स्वराज्य स्थापन करण्याची निष्ठा मनात बाळगली म्हणूनच स्वराज्याचे स्वप्न पूर्ण झाले. आपण ही आपल्या बिझनेसमध्ये कोणते ध्येय ठरविले आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला तर निश्चितच त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. 

चपळता: महाराजांनी युद्धाच्या वेळी, गनिमीकाव्याच्या वेळी, आग्र्यामध्ये पकडले गेल्यानंतरही जी चपळता, चतुराई आणि कौशल्य दाखवले त्यामुळे त्यांच्यातीळ एका वेगळ्याच चपळ आणि अत्यंत हुशार विचारसरणीचे दर्शन आपल्याला झाले. आपल्याला तसेच कौशल्य आणि चपळता आपल्या बिझनेसमधून दाखवून दिली पाहिजे.     

व्यवस्थापन:  महाराजांचे व्यवस्थापन हे अतिशय उत्तम होते. ज्याच्यामुळे स्वराज्याच्या बांधणीत कुठल्याही पद्धतीची समस्या आली नाही. मग ते आर्थिक व्यवस्थापन असो वा त्यांच्या मावळ्यांना युद्धनीती समजावून सांगणे असो. प्रत्येक संकटाला, प्रत्येक परिस्थितीला त्यांनी योग्य प्रकारे हाताळले. आपणही बिझनेसमधील व्यवस्थापन उत्तमरित्या हाताळले तर कोणत्याही समस्येतून बाहेर येत येईल. 

       स्त्रियांचा आदर:  छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच स्त्रियांचा आदर केला. प्रत्येक स्त्रीला ते आईच्या रूपात बघायचे आणि प्रत्येक स्त्रीला तेवढाच आदर द्यायचे. स्त्रियांविषयी कसलाही अनादर ते खपवून घेत नसत. त्याप्रमाणे आपणही आपल्या घरातील, घराबाहेरील, ऑफिसमधील किंवा बिझनेसमधील काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आदर करावा. 

दूरदृष्टी:  शिवाजी महाराजांनी त्यांच्या लहानपणीच स्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. त्यात त्यांना अनेकांची साथ मिळाली ज्यामुळे ते त्यांचे ध्येय आणि मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झाले. तीच दूरदृष्टी आपण आपल्या बिझनेसमध्ये वापरली, कोणते ध्येय ठेवले आणि त्यावर काम करणे सुरु केले तर नक्कीच आपण यशस्वी होऊ. 

नेतृत्वगुण:  जनतेचा 'जाणताराजा' अशी ओळख महाराजांना त्यांच्या उत्तम नेतृत्वामुळे मिळाली. संपूर्ण मावळ्यांचे, महाराष्ट्रातील जनतेचे नेतृत्व करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, चतुराई, चपळता, कौशल्य, बुद्धिमत्ता हे त्यांचे गुण होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मावळ्यांना आणि जनतेला त्यांच्या नेतृत्वावर विश्वास होता. हाच विश्वास आपल्या कर्मचाऱ्यांनी आपल्यावर ठेवणे आवश्यक आहे. उत्तम नेतृत्व तुमचा बिझनेस यशाच्या शिखराकडे घेऊन जाईल.   

छत्रपती शिवाजी महाराज हे यासर्व कारणांमुळे बिझनेससाठी तसेच आपल्या संपूर्ण जीवनासाठी एक आदर्श आहेत. आपल्या याच महाराजांना त्यांच्या जयंतीदिनी मानाचा मुजरा!