Blog-Image

पद्मभूषण श्री. बाबासाहेब नीलकंठ कल्याणी यांना 'बाबा' म्हणून सुद्धा ओळखले जाते. बाबासाहेब कल्याणी यांचे व्यक्तिमत्व इतके असामान्य आहे की यांना ओळखत नसणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. बाबासाहेब भारत फोर्जचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.. ७ जानेवारी १९४९ साली लिंगायत कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बेळगावात राष्ट्रीय मिलिट्री शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. १९७० साली त्यांनी बिट्स पिलानी मधून त्यांचे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स मधून एमएस केले. अतिशय कुशाग्र बुद्धीचे बाबासाहेब शिक्षणात  नेहमी सगळ्यात पुढे असायचे. त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत कसलीच हयगय केली नाही...

१९७२ साली बाबासाहेब यांनी भारत फोर्ज ही ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जॉईन केली. तेव्हा या कंपनीची वार्षिक उलाढाल १३ लाखांची होती. भारत फोर्ज ही जगातील अत्याधुनिक मशीन बनवण्यासाठी लागणारे मेटल मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे जी नंतर भारत, अमेरिका, जर्मनी, स्वीडन आणि चीन मध्ये विविध नवसुविधांसह विस्तारली गेली आणि आज जगभरात तिची ओळख आहे.. 

कल्याणी हे ऑटोमोबाईल कॉम्पोनेंट एक्सपोर्टचे पायोनिर मानले जातात. त्यांनी २००२ मध्ये भारत फोर्ज कडून सलग ८ वर्षे चीनला ऑटोमोबाईल घटकांची ५०% पर्यंत निर्यात केली. सयुंक्त राष्ट्र अमेरिकेत निर्माण केलेल्या प्रत्येक दोन ट्रक मधील एक ट्रक भारत फोर्ज द्वारे तयार केलेला आहे. त्यांच्या इंडस्ट्री मधील कारकिर्दी सोबतच त्यांचे समाजकार्य सुद्धा वाखणण्याजोगे आहे. समाजातील स्थानिक दुर्बल घटकातील मुलांना प्राथमिक शिक्षण देण्यात गुंतलेल्या पहिल्या पुणे एज्युकेशन फाऊंडेशनचे ते संस्थापक आहेत. या फाऊंडेशनची २००० मध्ये स्थापना झाल्यापासून १ लाखांपेक्षा जास्त मुलांना याचा लाभ मिळाला आहे. बाबासाहेब हे एका सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत  सार्वजनिक-खाजगी भागीदार म्हणून कार्यरत आहे...

ही संस्था पुण्यातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी स्वतंत्र तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करत आहे, तसेच देशाच्या इतर भागातही याची पुनरावृत्ती होत आहे. शिक्षणापासून वंचित असलेल्या किंवा गरजू लोकांना बाबासाहेब मदत करतात.. 

स्वच्छ आणि उत्सर्जन-रहित वातावरणाला हातभार लावण्यासाठी बाबासाहेब यांनी केनेरसिज लिमिटेडची (Kenersys LTD) स्थापना केली. ज्यायोगे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी विविध ऊर्जा कार्यक्षम पवन टर्बाइन तयार करता येतील.

बाबासाहेब यांना त्यांच्या व्यापार आणि इंडस्ट्री मधील योगदानाबाबत तसेच स्वीडन आणि भारतामधील व्यापारासाठी सहयोग दिल्याबद्दल भारतातील नामांकित पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला गेला.. 

स्वीडन आणि भारतातील व्यापार संबंध उत्तम केल्यामुळे त्यांना 'ध्रुवीय तारा' म्हणून नावाजले गेले. इतर पुरस्कारांमध्ये त्यांच्या कामगिरीसाठी २००४ मध्ये बिझनेस स्टॅंडर्ड ग्रुप द्वारा 'सिइओ ऑफ दी इयर', २००५ साली 'अंथरप्रेन्युअर ऑफ दी इयर', २००६ साली बिझनेस इंडिया मॅगझीन कडून 'जर्मन बिझनेसमन ऑफ दी इयर' आणि २००९ साली कील इन्स्टिट्यूट द्वारा 'ग्लोबल इकॉनमी प्राईज' असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत..

शिक्षणापासून अनेकांना प्रेरणा मिळते. हीच प्रेरणा दुसऱ्यांनाही मिळवून देण्यासाठी झटणारे फार कमी असतात. तसेच आपल्या ज्ञानाचा वापर व्यवसायात करून व्यवसायाला उंचीपर्यंत नेणारे सुद्धा कमीच असतात. अशाच लोकांपैकी एक असे व्यक्तिमत्व बाबासाहेब कल्याणी यांचे आहे. नक्कीच अशा व्यक्तीकडून आपणही प्रेरणा घ्यायला हवी..